लोणी काळभोर, ता. 15 : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या कडेला कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना न करता मोठा खड्डा खोदल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एचपी डेपो परिसरात घडली. हा प्रकार 14 सप्टेंबर रोजी उघडकीस आला. याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खड्ड्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर वाहतूक विभागातील पोलिस हवालदार विजय बब्रुवान कांबळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार चंद्रकांत ज्ञानेश्वर अर्नाळे (वय 47, रा. पिंपळखुटे, ता. माढा, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमनासाठी पोलिस पथक कवडीपाट टोलनाका ते नायगाव फाटा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कदमवाकवस्ती येथील एचपी डेपोच्या जवळ सेवा रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रस्त्यालगत मोठा खड्डा खोदलेला आढळून आला.

चौकशी केली असता, सदर काम ठेकेदार अर्नाळे यांनी घेतले असून ते जिओ कंपनीसाठी सुरू असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, रस्त्यालगत खोदकाम करताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही खबरदारी किंवा सुरक्षाव्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, सुमारे 2 बाय 4 बाय 3 फूट आकाराचा खड्डा धोकादायक पद्धतीने खोदण्यात आल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिस हवालदार कांबळे यांच्या फिर्यादीवरून ठेकेदार अर्नाळे यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







