पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यातील वाहनाला भरधाव दुचाकीने कट मारल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संचेती चौक परिसरात हा प्रकार घडला. धोकादायक पद्धतीने वाहन चालवत ताफ्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित दुचाकीस्वारावर आहे.

ही घटना 13 सप्टेंबर रोजी रात्री साडे 8 वाजण्याच्या सुमारास घडली. मोहोळ यांचा ताफा संचेती चौकातून पुढे जात असताना एका दुचाकीस्वाराने वेगाने वाहन चालवत ताफ्यातील गाडीला कट मारला. त्याची दुचाकी चालवण्याची पद्धत धोकादायक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे ताफ्यातील वाहनांसह संबंधितांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

या प्रकरणी 14 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त असलेले पोलीस उपनिरीक्षक ईश्वर भिकुले यांनी याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी शुभम विजय वनित, वय 32, याला या प्रकरणात नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे.








