डॉ. अशोक बालगुडे

पुणे : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शासकीय ताफ्यात दुचाकी घुसवण्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडल्याची माहिती समोर आली आहे . ताफ्यातील वाहनांकडून सायरन वाजवून स्पष्ट इशारा देण्यात आलेला असतानाही दुचाकीस्वाराने ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ ताफ्याच्या हालचालींना अडथळा निर्माण झाला.

13 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोहोळ यांचा शासकीय ताफा संचेती चौकातून जात होता. ताफ्यातील वाहनांनी सायरन वाजवून इतर वाहनचालकांना ताफा येत असल्याची सूचना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून एका दुचाकीस्वार तरुणाने ताफ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी सहायक पोलीस फौजदार ईश्वर भिकुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भिकुले हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्त असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत.
दुचाकीस्वाराने ताफ्यात शिरून अडथळा निर्माण केल्याने त्याच्याविरुद्ध आदेशाचे उल्लंघन तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काठे करीत आहेत.






