दौंड, ता. 15 : उसतोडीच्या कामासाठी दिलेल्या उचल रकमेच्या बदल्यात एका आदिवासी कुटुंबाकडून तब्बल 12 ते 18 तास रोज जबरदस्तीने काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काम सोडून गावी जाण्याचा प्रयत्न केल्यास मारहाण व धमक्या देत कुटुंबाला डांबून ठेवल्याचा तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे, तर गावी जाण्यासाठी दबाव आणल्याने मजुराची दुचाकी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अशोक राठोड आणि सौरभ उर्फ भागेश बापू टेंगले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हिलाल बन्सी भिल (वय 46, रा. पळसदळी, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिलाल भिल हे पत्नी, मुले, आई व मुलींसह ऊसतोडीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ऑक्टोबर 2025 मध्ये मुकादम अशोक राठोड याच्यामार्फत सौरभ उर्फ भावेश टेंगले यांच्याकडे ऊसतोडीच्या कामासाठी ते गेले होते. त्यावेळी दोन कुटुंबांसाठी मिळून 40 हजार रुपये उचल देण्यात आली होती.

कामावर नेण्यापूर्वी स्टॅम्प पेपरवर अंगठे घेऊन आठवड्याचा बाजार, अडचणीच्या वेळी गावी जाण्याची सुविधा तसेच अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ऊसतोडीचा हिशोब 408 रुपये प्रतिटन या दराने करण्याचेही सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर हिलाल भिल व त्यांच्या कुटुंबीयांना कासुर्डी आणि फलटण-साखरवाडी परिसरात ऊसतोडीसाठी नेण्यात आले. मार्च 2026 मध्ये त्यांना कासुर्डी येथील भोंडवेवस्ती परिसरातील डोंगरावर झोपड्या करून ठेवण्यात आले. तेथून पुन्हा ऊसतोडीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, गावी जाण्यास सक्त मनाई करण्यात आली. गावी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मारहाण व शिवीगाळ केली आहे.
‘काम सोडून पळालात तर खोलीत कोंडून मारीन’
काम सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास खोलीत कोंडून मारहाण करण्याची धमकी दिली जात होती. मालक व त्यांचे काही लोक कुटुंबीयांवर सतत लक्ष ठेवून पहारा देत असल्याने पळून जाणे शक्य होत नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी ‘तुम्ही भिल्ल जातीचे हाय, तुम्हाला ऊस तोडायचा हाय,’ अशा शब्दांत जातिवाचक अपमान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, गावी जाण्यासाठी दबाव आणल्यानंतर सौरभ टेंगले यांनी हिलाल भिल यांची हप्त्यावर घेतलेली दुचाकी (एमएच 54 डी 4207) कथितरीत्या ताब्यात घेतली. दुचाकी परत हवी असल्यास एक लाख रुपये द्या, त्यानंतर गावी जाऊ देतो, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर हिलाल यांच्या मुलाने तीन टप्प्यांत 50 हजार, 30 हजार आणि 20 हजार रुपये फोन-पेच्या माध्यमातून दिले. मात्र, पैसे दिल्यानंतरही दुचाकी परत करण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
1200 टन ऊस तोडला, तरी हिशोब नाही!
या काळात कुटुंबीयांकडून दररोज तब्बल 12 ते 18 तास काम करून घेण्यात आले. जवळपास 1200 टन ऊस तोडूनही आजपर्यंत कामाचा कोणताही हिशोब करून मोबदला दिला नसल्याचा आरोप हिलाल भिल यांनी केला आहे. यानंतर हिलाल यांच्या मुलाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे कुटुंबाच्या सुटकेसाठी तक्रार अर्ज केला. त्यानुसार 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी यवत पोलिस, तहसीलदारांच्या वतीने मंडळ अधिकारी आणि जनसाहस संस्थेचे प्रतिनिधी कासुर्डी येथे पोहोचले. त्यांनी कुटुंबाची सुटका केली. त्यानंतर कामगार विभागानेही त्यांचे जबाब नोंदवले.
मात्र, सुटकेनंतरही दुचाकी परत मिळाली नसल्याने हिलाल भिल यांनी यवत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी अशोक राठोड आणि सौरभ उर्फ भागेश बापू टेंगले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलमांसह बंधमजुरी पद्धती (उच्चाटन) अधिनियम आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






