यवत : अघोरी जादूटोणा आणि भूत उतरविण्याच्या प्रकाराला विरोध केल्याने तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील वाळकी येथे घडला आहे. भूतबाधा असल्याचे सांगत एका महिलेला जादूटोणा करण्याच्या नावाखाली मारहाण केल्याची माहिती पोलिसांना देणार असल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अभिजित बबन कोळपे (वय 27) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमल बबन कोळपे, संतोष डुबे, राधा भाऊ डुबे आणि मोहन भाऊ डुबे (सर्व रा. वाळकी, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित कोळपे यांच्या आई कमल कोळपे आणि मामा संतोष डुबे हे अघोरी जादूटोणा करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकाराला अभिजित यांनी विरोध केल्याने त्यांच्यात यापूर्वीही वाद झाले होते. त्यामुळे ते पत्नीसमवेत एंरोडली, शिरूर येथे राहण्यास गेले होते.

दरम्यान, 8 ते 9 सप्टेंबरच्या रात्री वाळकी गावच्या हद्दीत एका महिलेच्या अंगात भूत असल्याचे सांगून तिच्यावर जादूटोणा व भूत उतरविण्याचा प्रकार करण्यात आल्याचे अभिजित यांच्या निदर्शनास आले. या प्रकारात संबंधित महिलेला शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकाराबाबत तक्रार करणार असल्याचे अभिजित यांनी सांगितल्यानंतर 12 सप्टेंबर रोजी त्यांचे मामा संतोष डुबे यांनी फोन करून वाळकी येथे चर्चेसाठी बोलावले. त्यानंतर अभिजित हे प्रमिला सलगर व बापू रुपनवर यांच्यासह वाळकी येथे गेले असता संतोष डुबे, राधा डुबे आणि मोहन डुबे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करून तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.
यानंतर संतोष डुबे आणि मोहन डुबे यांनी अभिजित यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संतोष डुबे यांनी हातातील कुऱ्हाडीने अभिजित यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या प्रमिला सलगर यांनाही राधा डुबे यांनी मारहाण केली आहे.
या घटनेनंतर अभिजित यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी राहू येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी यवत ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार कमल बबन कोळपे, संतोष डुबे, राधा भाऊ डुबे आणि मोहन डुबे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर करीत आहेत.







