मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील मालिका रुग्णालयात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. टेरेसवर गॅस गळतीमुळे झालेल्या या दुर्घटनेत रुग्णालयाचे 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेच्या वेळी काही कर्मचारी टेरेसवर बसले होते. त्यावेळी एका कर्मचाऱ्याला चहा बनवण्यास सांगण्यात आले. चहा करण्यासाठी गॅस पेटवण्याचा प्रयत्न करताच अचानक मोठा भडका उडाला आणि भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, टेरेसवर ठेवलेल्या गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने ही दुर्घटना घडली. मात्र, सिलिंडरचा स्फोट आणि आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
जखमींवर सुरुवातीला मालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा, गॅस सिलिंडरची सुरक्षा आणि नियमांचे उल्लंघन यावर प्रश्न निर्माण झाले आहेत.

घटना घडताच पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली. पोलिसांनी जखमींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत, परंतु नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे सध्या या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

स्थानिक नागरिकांकडून मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाकडून रुग्णालयाच्या सुरक्षेची कसून तपासणी करण्याची मागणी होत आहे. तपासादरम्यान निष्काळजीपणा किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. आगीत झालेले आर्थिक नुकसान आणि दुर्घटनेचे खरे कारण पूर्ण तपासानंतरच समोर येईल.







