पुणे : इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बाबीर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी 100 एकर वनजमीन ग्रामपंचायतीच्या नावावर करावी, मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा द्यावा आणि पर्यटन आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी भाजपचे पुणे जिल्हा महामंत्री डॉ. आकाश कांबळे यांनी केली आहे. बाबीर देवस्थानच्या जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी हे निवेदन सादर केले.

कार्यक्रमा दरम्यान बोलताना डॉ. कांबळे यांनी देवस्थानच्या विकासातील प्रमुख अडचणी मांडल्या. भगवान बाबा गडाच्या धर्तीवर येथील 100 एकर वनजमीन स्थानिक प्रशासनाकडे हस्तांतरित करावी, अशी त्यांनी विनंती केली. सध्या हे मंदिर ‘क’ श्रेणीत असल्याने विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे निरा नरसिंहपूर मंदिराप्रमाणे बाबीर देवस्थानचा कायापालट करण्यासाठी या मंदिराला ‘ब’ दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

पर्यटकांसाठी भक्तनिवास, पाहुण्यांसाठी विश्रामगृह आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्याला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली. सन 2017-18 मध्ये या विकास आराखड्यासाठी 55 लाख रुपये मिळाले होते, तर नुकतेच पर्यटन विकास महामंडळाने 1.68 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, ठोस निधीअभावी अनेक कामे रखडली आहेत.

याशिवाय, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खडकवासला कालव्याचा पूल अतिशय अरुंद असल्याने येथे सतत वाहतुकीची कोंडी होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन पुलाकरिता 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






