डॉ. अशोक बालगुडे

पुणे : राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, वाहन बंद पडले किंवा वैद्यकीय मदतीची गरज भासली, तर मदतीसाठी असलेली ‘1033′ हेल्पलाइन आता अधिक सक्षम होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हेल्पलाइनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग आणि स्मार्ट इमर्जन्सी-रिस्पॉन्स प्रणाली जोडणार आहे.

2018 मध्ये सुरू झालेली 1033 हेल्पलाइन 24 तास कार्यरत असून, सुमारे 1.46 लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांवर सेवा देत आहे. दररोज सुमारे 15 हजार कॉल या हेल्पलाइनवर येतात. अपघात, वाहन बिघाड, रुग्णवाहिका, क्रेन, गस्ती वाहन, टोल तसेच FASTagसंबंधी तक्रारी या माध्यमातून हाताळल्या जातात.

नव्या प्रणालीमुळे मदतीसाठी फोन करणाऱ्या वाहनचालकाचे अचूक लोकेशन तातडीने निश्चित करता येईल. त्यानुसार रुग्णवाहिका, क्रेन किंवा गस्ती वाहन घटनास्थळी पाठविण्याची प्रक्रिया जलद होईल. विविध भारतीय भाषांमध्ये AI आधारित संवादाची सुविधाही प्रस्तावित आहे.
‘नेक्स्ट जनरेशन 1033’ प्रणाली विकसित करण्यासाठी NHAIच्या अखत्यारीतील इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL)ने तांत्रिक सूचना व प्रस्ताव मागविले आहेत. AI आणि मानवी हस्तक्षेपाची सांगड घालून महामार्गावरील आपत्कालीन मदत अधिक वेगवान करण्याचा प्रयत्न आहे.






