लोणी काळभोर, ता. 4 : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 58 वर्षीय महिलेला पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडताना भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एचपीसीएल जवळ 29 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सात टाके घालावे लागले. तसेच डाव्या पायालाही दुखापत झाली आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपती दिनबंधू नाथ (वय 58 , रा. मुक्ता कॉम्प्लेक्स, कदमवाकवस्ती) असे जखमी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपती नाथ या नेहमीप्रमाणे 29 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. सकाळी सातच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील एचपीसीएलजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर कोसळून जखमी झाल्या.
दरम्यान, शहाजी क्षिरसागर यांनी जखमी महिलेला आपल्या रिक्षातून शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांच्या मुलीला फोन करून अपघाताची माहिती दिली. मुलगी आणि जावई रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी संपती नाथ यांना विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डोक्याला सात टाके घालण्यात आले असून डाव्या पायाच्या गुडघ्याखालीही दुखापत झाली होती. 2 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

धडक देणाऱ्या वाहनाची माहिती जखमी महिलेला आठवत नसल्याने वाहनचालकाची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर जखमी महिलेला उपचारासाठी मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची तक्रार त्यांच्या मुलीने दिली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.







