लोणी काळभोर : गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो आहे. विजेचा होणारा खेळखंडोब्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. कोरड्या व उष्ण हवेचे प्रमाण वाढल्याने बाष्पोत्सर्जनात वाढ झाली आहे. परिणामी असह्य उकाडा जाणवत आहे. घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
कोणतीही पूर्वसूचना न देता होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहेत. या सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. महावितरणने मान्सूनपूर्व कोणतीही तयारी केली नसल्यामुळे सातत्याने वीज बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच वीजपुरवठा सूचना न देता खंडित केला जात आहे. साधारणत: तीन ते पाच तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अपार्टमेंट-सोसायट्यांमध्ये पाण्याच्या प्रश्न उद्भवत आहे. पाण्याअभावी महिला वर्गाची कामे रखडतात. तर, चाकारमान्यांना त्यांच्या आस्थापनाला जाण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
कडक उन्हाळ्यात लाईट जाण्याचे प्रमाण कमी होते. मात्र ऑगस्ट महिना निम्मा संपला मात्र दिवसातून अनेकवेळा व रात्रीही वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही विजेचा लपंडाव सुरूच असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. विजेवर अवलंबून असणाऱ्या लहान-मोठ्या उद्योगांना या महिन्यात फार मोठे नुकसान सहन करावे लागले असून, त्यांची अनेक कामे विजेविना खोळंबली आहेत.
दरम्यान, वीज वसुलीसाठी ग्राहकांकडे वारंवार पाठपुरावा करणारे वीज कर्मचारी खंडित वीज पुरवठ्याकडे का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लहान व्यावसायिकांचे देखील आर्थिक नुकसान होत असून, दुग्धजन्य पदार्थ देखील खराब होत आहेत. शासकीय कार्यालये, खाजगी बँका, कार्यालये येथील कामकाजावर देखील खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम होत असून, नागरिकांना कामासाठी तासंतास ताटकळत राहावे लागत आहे.
याबाबत बोलताना लोणी स्टेशन येथील हॉटेल व्यावसायिक नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, “दिवसभरात 10 ते 15 वेळा पंधरा ते तास ते दीड तासाच्या अंतरात अचानक वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे वीज उपकरणांचे नुकसान होत आहे. तसेच हॉटेलमध्ये येणारे ग्राहक उकड्याने हैराण होत आहेत. यामुळे व्यावसायावर परिणाम होत आहे. वीज भरले नाही की तोडले जाते मग वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो त्याला जबाबदार कोण
याबाबत बोलताना लोणी काळभोर येथील महावितरणचे सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे म्हणाले, “फुरसुंगी येथील ट्रान्सफार्मर ब्रेक डाऊन झाला आहे. दुरुस्ती करण्याचे काम सुरु असून अर्धा ते एक तासात विजपुरवठा सुरुळीत करण्यात येत आहे.