लोणी काळभोर, ता. 9 : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत गाडी पार्क करताना दुचाकीने कारला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील श्री. दत्त मंदीराच्या जवळ गुरुवारी (ता.6) सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) ठाण्यात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल पंडीत बोरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रितम प्रतापराव मोरे (वय-47, पत्ता-बी/403, रविदर्शन बिल्डींग, हडपसर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितम मोरे हे कुटुंबासोबत हडपसर परिसरात राहतात. मोरे हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते फलटण येथे मागील 15 दिवसापूर्वी कामानिमित्त गेले होते. तेथील काम आटोपून मोरे हे कुटुंबासोबत घरी माघारी निघाले होते. मोरे हे पुणे-सोलापूर महामार्गावरून ये जा करत असताना नेहमी श्री. दत्त मंदीर येथे थांबत असायचे. आणि देवाचे दर्शन केल्यानंतर पुढील प्रवास करत असत. त्यामुळे परतीच्या प्रवासात देखील ते देवाचे दर्शन घेण्यासाठी ते थांबणार होते.
दरम्यान, मोरे हे त्यांच्या ताब्यातील चारचाकी टाटा कंपनीची टियागो गाडी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या दुकानालगत मोकळ्या जागेत पार्किंग करण्यासाठी घेत असताना, हिरो कंपनीची स्लेंडर दु-व्हिलर (क्र एम.एच.12 एक्स 6006) वरिल चालक विशाल बोरे याने जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या बोनेटला जोरात धडक दिल्याने बोनेट, रेडीगेटर, व समोरील काच, एअर बैंग, हेडलाईट, सस्पेन्शन इत्यादीचे नुकसान झाले आहे.
दुचाकीस्वार विशाल बोरे याने भरधाव वेगाने व बेदकारपणे दुचाकी चालवून या अपघातात व कारच्या नुकसानीस कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद प्रितम मोरे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार बोरे याच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कायदा 2023 चे कलम 281 , 324(4) मोटार वाहन कायदा कलम 184, 119 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार राणी खामकर करत आहेत.






