उरुळी कांचन, (पुणे) : भरवस्तीतील एका (Uruli Kanchan) वसाहतीत बेकायदेशीररीत्या गांजा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या इसमावर उरुळी कांचन पोलिसांनी धाड टाकून त्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 16 हजार 214 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.

हि कारवाई उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती येथील ढमढेरे कॉलनीतील ‘स्वयंभू सोसायटी’च्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 406 मध्ये करण्यात आली. फिरोज महमद शेख (वय 30, सध्या रा. स्वयंभु सोसायटी प्लॅट नं. 406 ढमढेरे कॉलनी, उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे मुळ रा. कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यत आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुमित वाघ यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, तुपे वस्ती येथील ढमढेरे कॉलनीतील ‘स्वयंभू सोसायटी’च्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 406 मध्ये एक इसम गांजाची विक्री करत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, उपविभागीय पोलीस अधिकारी (दौंड विभाग) यांची तोंडी मंजुरी घेऊन तात्काळ दोन सरकारी पंच, फोटोग्राफर आणि वजनकाटा मापारी यांच्यासह पथक तयार करण्यात आले.
23 फेब्रुवारीला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाने फ्लॅट नंबर 406 वर छापा टाकला. दरवाजा उघडल्यानंतर तिथे फिरोज शेख हा इसम मिळून आला. एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 50 नुसार कायदेशीर नोटीस देऊन पोलिसांनी घराची झडती घेतली असता, किचनमधील मांडणीजवळ एका पिशवीत पांढऱ्या रंगाच्या 27 लहान पिशव्यांमध्ये हिरवट रंगाचा उग्र वासाचा गांजा मिळून आला. यावेळी 873 ग्रॅम वजनाचा गांजा व डिजिटल वजनकाटा असा 16 हजार 214 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या गांजातील 30 ग्रॅम नमुना रासायनिक परीक्षणासाठी वेगळा काढून उर्वरित माल सीलबंद केला आहे. याप्रकरणी फिरोज शेख याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8(क), 20(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस हवालदार जगताप, प्रविण चौधर, निलेश जाधव, कमलेश होले, महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ आणि पोलीस शिपाई यादव यांच्या पथकाने केली.







