पुणे: पुण्यातील खराडी परिसरात एका भोंदूबाबाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. राधामोहन मिश्रा नावाच्या या व्यक्तीने स्वतःच्या आश्रमात महिला अनुयायांसमोरच एका तरुणीवर अमानुष अत्याचार केले आहेत. आश्चर्याची आणि संतापजनक बाब म्हणजे, या हिंसक कृत्याला तो ‘प्रसाद’ असे म्हणत असे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा आणि स्वामी कंवलनयन यांच्यासह ६ महिला अनुयायांना अटक केली असून, सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत.

पीडित तरुणीने दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. २०१३ पासून उबाळेनगर येथील आश्रमात तिचा छळ सुरू होता. कामात थोडीही चूक झाल्यास तिला टेझर गनचे शॉक देणे, मेणबत्तीने चटके देणे आणि बेदम मारहाण करणे असे अत्याचार केले जात असत. पीडितेला विवस्त्र करून मिश्राच्या खोलीत ढकलले जायचे आणि हे करत असताना तिथे अन्य महिला अनुयायी उपस्थित असत. विरोध केल्यास ‘हाच मुक्तीचा मार्ग आहे’ असे सांगून तिची गळचेपी केली जात असे.

तपासादरम्यान असेही उघड झाले की, अत्याचाराच्या आधी पीडितेला गुंगीची इंजेक्शने दिली जात किंवा तिचे हात-पाय बांधले जात. तिला अमानुषपणे मूत्र पाजल्यासह तिच्यासोबत गंभीर छळ करण्यात आला आहे. काही महिला अनुयायी आरोपीला अश्लील व्हिडिओ दाखवून पीडितेवर अत्याचार करण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या.
या प्रकरणात आता एक नवीन कायदेशीर वळण आले आहे. अटक करण्यात आलेल्या ६ महिला आरोपी या व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी मध्यरात्री झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यावर राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.







