इंदापूर, आदित्य बोराटे –

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील शिंदेवस्ती येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका कुटुंबावर घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मंगेश लहूदास बनसोडे, बाळू जनार्दन बनसोडे, महेश लहूदास बनसोडे, गोरख दत्तू शिंदे, अमित अंकुश बनसोडे, अथर्व बाळू बनसोडे आणि सुभाष जाधव बनसोडे (सर्व रा. शिंदेवस्ती, पळसदेव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शरद गणपत काळे (वय 48, रा. शिंदेवस्ती, पळसदेव, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. 30) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांची पत्नी वैशाली आणि मुलगी वैष्णवी घरी असताना आरोपींनी त्यांच्या घराच्या दरवाजावर दगड मारून दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. त्यानंतर हातातील काठ्या, केबल वायर, लोखंडी गज आणि चाकूच्या साहाय्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली.
या हल्ल्यात फिर्यादी शरद काळे यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पत्नी वैशाली काळे आणि मुलगी वैष्णवी यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच घरातील सुमारे 91 हजार रुपये रोख रक्कम गायब झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.







