मुंबई: मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. 3 जून 2006 रोजी कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या ऐतिहासिक निकालाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या निकालाचा थेट परिणाम ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भविष्यावर होण्याची शक्यता आहे. निकालाचा निकाल लागल्यानंतर ओमराजे शिंदे गटाची साथ देणार की विरोधात राहणार, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.

न्यायालयाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नमूद केले की, या निकालाचा आणि पक्षांतराचा कोणताही थेट संबंध नाही. आपण अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसून, आपल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच पुढील राजकीय पाऊल उचलणार आहोत. तसेच, विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ओमराजे यांच्या या सावध भूमिकेमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या यशाबाबत आता मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. जर त्यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला, तर शिंदे गटाला पक्षांतर करण्यासाठी आवश्यक असलेला 2 तृतीयांश खासदारांचा आकडा गाठणे कठीण होऊ शकते. आता ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.






