ओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावच्या हद्दीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास पिंपरी पेंढार येथील डेरेमळा येथे घडली आहे. सुजाता रवींद्र डेरे (वय-४०) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी पेंढार येथील डेरेमळा येथे सुजाता डेरे ही महिला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर पडली होती. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सुजाता डेरे यांच्यावर झडप घालून त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याने सुजाता डेरे यांना जखमी करून घरापासून १०० फूट अंतरावर ओढत नेऊन ठार केले.
या घटनेमुळे पिंपरी पेंढार आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर सुजाता डेरे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिबट्यामुळे नाहक बळी जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. घराबाहेर पडायचे की नाही? असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. दिवसेंदिवस जुन्नर तालुका हा बिबट्यामुळे भीतीच्या छायेत असल्याचे बोलले जात आहे.