पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे घडलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 17 एप्रिल 2026 रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिरूर यांनी हा निर्णय दिला.

या प्रकरणातील आरोपी करण जालींदर भोळे (वय 20, रा. पाबळ फाटा, सयदनगर, शिरूर) याला भादवि कलम 302, 324 आणि 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. मा. सुरेश पोळ यांनी हा निकाल दिला.
फिर्यादी महिलेच्या जबाबानुसार, आरोपी आणि तिच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून वाद सुरू होते. आरोपीने तिच्या पतीला वारंवार धमक्या दिल्या होत्या. 9 फेब्रुवारी 2021 रोजी आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करून तिच्या पतीचा खून केला. त्यानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता.
या प्रकरणाचा तपास किरण उंद्रे यांनी केला. सरकारी बाजू विजय फरगडे आणि एस एस पताळे यांनी भक्कमपणे मांडली. या खटल्यात एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकरणात नेत्रसाक्षीदार, लहान मुलांची साक्ष, तसेच तीन डॉक्टर आणि पोलिस अधिकाऱ्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.
या संपूर्ण कारवाईत संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कोर्ट अंमलदार म्हणून बाळासाहेब गदादे, रेणुका भिसे आणि रोहित बाचल यांनी काम पाहिले. पुढील न्यायालयीन प्रक्रियेत विद्याधर निचित (पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार) आणि संतोष घोळवे (जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या निकालामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा मिळत असल्याचा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.






