Uruli Kanchan Crime उरुळी कांचन, ता. 27 : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात अवैध धंद्यांचा अक्षरशः महापूर आल्याची धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे. पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असल्याने देहविक्री, मटका-जुगार, गांजा, हातभट्टी दारू यांसारखे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे “अवैध धंदा करायचा असेल तर उरुळी कांचनला या,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. Uruli Kanchan Crime

उरुळी कांचन गावात 4 मटक्याचे धंदे, चिमणी पाखरू सोरटचे तीन धंदे, 6 हातभट्टी विक्रीचे मोठे धंदे, 8 ठिकाणच्या टपरी व दुकानांमधून पेट्रोलची अवैध विक्री, दोन ठिकाणाहून गांजा, दोन जुगाराचे क्लब व पांढरस्थळ परिसरात 3 हातभट्ट्या असे अवैध धंदे सुरु आहेत. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळेशिवार परिसरात 8 ते 10 ठिकाणी हातभट्टी तयार केली जात आहे. नायगाव येथे एक मटका जुगाराचा अड्डा आहे. वाढत्या अवैध धंद्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. Uruli Kanchan Crime
पुणे शहरासह जिल्ह्यात या परिसरात तयार केलेल्या हातभट्टी दारूची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. अनेक टपऱ्यांवर अवैध गुटखा व गांजाची विक्री केली जाते. तर चौकाचौकात व काही केशकर्तनाच्या दुकानात मटका खेळला जातो. अवैध धंद्यांच्या त्रासामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. काही ठराविक मंडळी ही पोलीस आणि अवैध धंदे करणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे काम करताना सर्रासपणे दिसून येत आहे. Uruli Kanchan Crime
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गालगत अनेक अवैध व्यवसाय सुरु आहेत. संबंधित अवैध धंदे चालकांच्या पाठीमागे काही राजकीय नेते व पोलीस खात्यातील काही वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे हे धंदे राजरोसपणे सुरु असून गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे ”अवैध धंदे जोमात, तर पोलीस प्रशासन कोमात”, अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आलेली आहे. Uruli Kanchan Crime
सोरतापवाडी येथील लॉजवर कारवाई कधी?
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकड्या पुलापासून 150 मीटर अंतरावर बार व लॉज आहे. या लॉजमधून 5 ते 6 मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असून ग्राहकांकडून 1200 रुपये घेतले जात आहे. हा एवढा मोठा खुलेआम लॉज सुरु असतानादेखील पोलीस प्रशासनकडून अद्याप कारवाई केली जात नाही. हा लॉज नेमका कोणाच्या आशीर्वादाने चालतो. याचे गौडबंगाल अद्यापपर्यंत समजले नाही. हा लॉज चालू ठेवण्यासाठी वरदहस्त देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. Uruli Kanchan Crime
शिंदवणे येथील पंख्याची हवा कोणकोण खातेय?
शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील काळेशीवार परिसरात एका ‘बाई’चा मोठा हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा आहे. “या चार पाते असलेल्या पंख्याची हवा प्रतिमाह सुमारे दोन लाखांपर्यंत मोजली जाते. त्यामुळे पंख्याची हवा नेमकी कोणकोण खात आहे?”असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी स्थानिकांकडून होत आहे. अवैध धंद्यांच्या या ‘पंख्याची हवा’ नेमकी कोणाला मिळते, याचा पर्दाफाश होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. Uruli Kanchan Crime
जिल्हा पोलीस अधीक्षक कारवाई कधी करणार?
जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची तगडी यंत्रणा असतानाही अवैध धंदे बिनधास्त सुरु आहेत. या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरु आहे. तसेच हे सगळे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत, मग उरुळी कांचन पोलीस नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेले जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल हे यावर ठोस उपाययोजना म्हणून काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. Uruli Kanchan Crime







