उरुळी कांचन, (पुणे) : कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघालेली 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली. ही घटना बुधवारी (ता. 25) दुपारी उघडकीस आली. नातेवाईक आणि मैत्रिणींकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने नातेवाईकांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची तरुणी ही उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघाली होती. ती दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नेहमी घरी परतत असते. मात्र, त्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ती घरी न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.
तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे आढळले. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, मैत्रिणी तसेच सोरतापवाडी आणि उरुळी कांचन कॉलेज परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही मिळून आली नाही. अखेर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.








