पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक चारबाहेर खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या मंदार किवळे याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंदार न्यायालयात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी दोन दिवस आधी हल्ल्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील एकूण नऊ आरोपींपैकी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुधवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. कात्रज येथील शुभम चव्हाण खून प्रकरणातील आरोपी मंदार किवळे (वय ३५) याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. न्यायालयीन कामकाजासाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला असताना सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र, गोळी न लागल्याने कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात मंदारच्या दोन्ही हातांच्या पंजांना गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार जामिनावर बाहेर आल्यानंतर तो कुठे आहे, याची आरोपींना माहिती नव्हती. मात्र, त्याची न्यायालयात तारीख असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी दोन दिवस आधी हल्ल्याचा कट रचला. या हल्ल्यासाठी सुपारी देण्यात आली होती. ठरलेल्या रकमेपैकी काही पैसे आरोपींना देण्यात आले होते. त्यातून त्यांनी हल्ल्यासाठी शस्त्रे खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सुरुवातीला एक ते दीड तासांत तीन आरोपींना पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दौंडच्या दिशेने पळून जाणाऱ्या अन्य आरोपींनाही पोलिसांनी पकडले. आयुक्तांच्या माहितीनुसार, एकूण नऊ आरोपींपैकी आठ जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. अन्य संशयितांचाही शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त स्वतः करणार आहेत.
या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होत असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांच्या प्रतिसादाची बाजू मांडली. घटना घडताच घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी जखमीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. अर्ध्या तासाच्या आत त्याच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमीचा जीव वाचण्याची आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
“गेल्या सहा महिन्यांत पुण्यात कोणताही गंभीर गुन्हा घडलेला नाही. कोयत्याने हल्ले आणि गोळीबाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. कालची घटना गंभीर असली, तरी एका घटनेच्या आधारे संपूर्ण शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही,” असे आयुक्त म्हणाले.
या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी केवळ एकाच ठिकाणी राहतात म्हणून त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. तर हल्ल्यासाठी वापरलेली वाहने जप्त केली असून, सीसीटीव्ही आणि मोबाईलमधील फुटेजही पोलिसांकडे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
हत्येसाठी वापरलेले पिस्तूल आणि कोयते कुठून आणले, हल्ल्याचा कट कोणी रचला आणि त्यामागील आर्थिक व्यवहार काय होते, याचा तपास करायचा असल्याने सरकारी पक्षाने दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.






