पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक चारबाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात गेल्या दीड-दोन वर्षांत गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुण्याची जबाबदारी स्वीकारून शहराचे पालकत्व घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गृहखाते आणि पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. विद्येचे माहेरघर आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारी वाढणे ही केवळ शहरापुरती मर्यादित बाब नसून संपूर्ण राज्य आणि देशासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारीच्या आकडेवारीचा संदर्भ देत सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारीतील विभागाच्या अहवालानुसार, गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे देशात पाचव्या आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुण्याच्या आर्थिक आणि सामाजिक महत्त्वाकडे लक्ष वेधताना त्यांनी हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा उल्लेख केला. या आयटी पार्कमध्ये सुमारे सहा लाख लोक काम करतात. अनेक महत्त्वाच्या संस्था, मोठी आर्थिक उलाढाल आणि व्यवसाय पुण्यातून चालतात. अशा महत्त्वाच्या शहरात गुन्हेगारी वाढणे पुणे, महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी घातक असल्याचे त्या म्हणाल्या.
आपण मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असून त्यांना पुन्हा विनंती करत असल्याचे सुळे यांनी सांगितले. “एक लोकप्रतिनिधी, पुण्याची नागरिक आणि एक महिला म्हणून मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी पुण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी आणि शहराचे पालकत्व स्वीकारावे,” असे आवाहन त्यांनी केले.






