आदित्य बोराटे

इंदापूर: तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ बुधवारी (ता. २५) इंदापूरमध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. बनसोडे हे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांची कामे प्रामाणिकपणे मार्गी लावणारे अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे काहींचे हितसंबंध बाधित झाल्याने त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप मोर्चातील नेत्यांनी केला. ‘जीवन बनसोडे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत,’ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. हलगीचा कडकडाट, घोषणांचा गजर आणि सहभागी नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी तहसीलदार बनसोडे यांच्या कामकाजाचे समर्थन करत त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामागील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे म्हणाले, ‘‘तहसीलदार बनसोडे हे गोरगरीब जनतेची कामे करणारे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे अधिकारी आहेत. त्यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले आहेत.’’
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अॅड. राहुल मखरे यांनी मतदार यादीतील नावांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर आरोप केले. ते म्हणाले, ‘‘तालुक्यातील अनेक गावांमध्ये हयात असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी काही भाजप कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने अर्ज दिले आहेत. हा प्रकार तहसीलदारांच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यासाठी आंदोलन केले जात असल्याचा आमचा आरोप आहे.’’
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संजय सोनवणे म्हणाले, ‘‘विरोधक आकसापोटी आंदोलन करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहिले पाहिजे.’’
यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले, मधुकर भरणे, प्रताप पाटील, सागर मिसाळ, शशिकांत तरंगे, सभापती हर्षवर्धन लोंढे, नगराध्यक्ष भरत शहा,श्रीराज भरणे, तुषार जाधव, बाळासाहेब ढवळे, सचिन सपकळ, अतुल झगडे, शिवाजी मखरे, शरद चितारे, भाऊसाहेब जाधव, राजश्री मखरे, पराग जाधव, बाळासाहेब सरवदे, भाऊसाहेब सपकाळ, अॅड. किरण लोंढे, अनिकेत वाघ आदी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
‘टीका करणाऱ्यांनी इतिहास तपासावा’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन सपकाळ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘तहसीलदार हे न्यायाधीशाच्या भूमिकेत काम करत असतात. एखाद्या प्रकरणात निर्णय घेताना सत्य परिस्थिती पडताळून न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्यावर अन्याय झाल्याची भावना असू शकते. अशा व्यक्तींशी संपर्क साधून विरोधक या विषयाचा बाऊ करत आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपला पूर्वीचा इतिहास तपासावा. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल,’’ असा इशाराही त्यांनी दिला.






