मुंबई : मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सध्या लागणारा तीन ते चार तासांचा प्रवास लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. उरण तालुक्यातील करंजा आणि अलिबाग तालुक्यातील रेवस यांना धरमतर खाडीवरून जोडणाऱ्या रेवस-करंजा सागरी पुलाचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-अलिबाग प्रवासाचा कालावधी अवघ्या ४५ मिनिटांवर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रवाशांचे जवळपास दोन ते तीन तास वाचू शकतील. सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठेवले आहे.

या प्रकल्पांतर्गत एकूण १० किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित केला जात आहे. त्यामध्ये दोन किलोमीटर लांबीच्या मुख्य सागरी पुलाचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासून पुलाची उंची सुमारे ४५ मीटर असणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी केबल स्टेड गर्डर तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
पुलाची उंची लक्षात घेता, त्याखालून मोठ्या मालवाहू जहाजांची वाहतूकही अडथळ्याविना सुरू राहू शकणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर अलिबाग, उरण, पनवेल आणि मुंबई यांच्यातील प्रवास अधिक जलद होईल. विशेषतः जेएनपीए बंदर, अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला या मार्गामुळे जलद जोडणी मिळणार आहे.

रेवस-करंजा पुलाची संकल्पना १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात मांडण्यात आली होती. मात्र, हा प्रकल्प तब्बल साडेचार दशके प्रलंबित राहिला. उरणचे आमदार महेश बालदी यांनी गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकल्पाला गती मिळाल्याचे सांगितले जाते.
नोव्हेंबर २०२८ पर्यंत हा पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर अलिबागसह रायगडच्या संपूर्ण किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय आयात-निर्यात व्यापार, मालवाहतूक, औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगाराच्या संधींनाही या मार्गामुळे फायदा होऊ शकतो.






