पुणे: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी (ता. 25) एका तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मंदार किवळे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी आधी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मंदारवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 5 प्रौढ आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अक्षय सुभाष चव्हाण (20), अमोल रामचंद्र चव्हाण (48), स्वप्निल बाजीराव गवळी (28), ओंकार संतोष पवार (18) आणि सूरज साधू मालेकर (22) यांचा समावेश आहे. एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी पूर्ववैमनस्यातून मंदारला लक्ष्य केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 6 जणांना ताब्यात घेण्यात यश आले असून, उर्वरित 2 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालयाकडून आरोपींच्या कोठडीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.






