भिगवण, ता. 26 : घरात घुसून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना म्हसोबाची वाडी (ता. इंदापूर) येथे घडली. ही घटना 27 ऑक्टोंबरला घडली. या प्रकरणी भिगवण पोलिसांत आदित्य मोहन खंडाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास महिला घरात आपल्या लहान मुलीला दूध पाजत होती. त्यावेळी आरोपी आदित्य खंडाळे हा अचानक घरात आला आणि दरवाजा आतून बंद केला. महिलेने तो घरात का आला, अशी विचारणा केली असता त्याने महिलेच्या मानस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केली आणि आरोपीला झटकून दरवाजा उघडून घराबाहेर धाव घेतली. तिचा आवाज ऐकून चुलत सासरे घरासमोर आले. त्यावेळी आरोपी घरातून बाहेर आला आणि घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास सोडणार नाही, अशी धमकी देत पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर महिलेने पतीला याबाबत सांगितले नाही. पती रागीट स्वभावाचा असल्याने त्याला हा प्रकार सांगण्याची भीती वाटत होती. त्यामुळे तिने बराच काळ घटना कोणालाही सांगितली नाही.

दरम्यान, मात्र आरोपीकडून पुन्हा धमक्या मिळू लागल्याने तिने अखेर पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांशी चर्चा करून महिला आपल्या आईसोबत भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.






