जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची आणखी एक गंभीर घटना घडली आहे. शेतात भात कापणीचे काम करत असलेल्या सासू आणि सुनेवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या घटनेत 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिची 35 वर्षीय सून गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी दुपारी पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भोईरवाडी येथे ही घटना घडली.

भिमाबाई जिजाभाऊ भोईर आणि त्यांची सून अश्विनी सुरेश भोईर या दोघी शेतात भात कापणी करत होत्या. त्याचवेळी जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने भिमाबाई यांच्या गळ्यावर हल्ला केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या अश्विनी भोईर यांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या धावपळीत त्या खाली पडल्या आणि त्यांच्या हाताचे हाड मोडले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर भोईरवाडी आणि पिंपळगाव जोगा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्नर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर असून अलीकडे त्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.






