पुणे : पुणे विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विमानतळ परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने पिकअप-ड्रॉप व्यवस्थेत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी आलेल्या वाहनांना संबंधित मार्गिकेत जास्तीत जास्त 15 मिनिटेच थांबता येणार आहे. या वेळेचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांना 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.

नव्या नियमाची माहिती वाहनचालकांना व्हावी, यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक स्वरूपात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर 1 डिसेंबरपासून नियमाची कठोर अंमलबजावणी सुरू होईल.
विमानतळावर दररोज प्रवाशांची संख्या वाढत असल्याने प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर वाहनांची गर्दी होत आहे. अनेकजण प्रवाशांची वाट पाहण्यासाठी पिकअप-ड्रॉप मार्गिकेत बराच वेळ गाड्या उभ्या करतात. त्यामुळे इतर वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण होतो. ही समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने थांबण्याची वेळ निश्चित केली आहे.

नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी विमानतळावर स्वयंचलित क्रमांक ओळख प्रणाली (ANPR) बसवण्यात आली आहे. प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी विशेष कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे वाहनांचे क्रमांक आणि छायाचित्रे नोंदवतील. त्यानंतर संबंधित वाहन किती वेळ मार्गिकेत थांबले, याची संगणकीय पद्धतीने गणना केली जाईल. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांवर 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. हा दंड फास्टॅग किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून भरता येणार आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, विमानतळावर प्रवाशांना सुरक्षित आणि विनाअडथळा प्रवासाचा अनुभव देणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. नवीन व्यवस्थेमुळे वाहतुकीला शिस्त लागेल आणि कोंडी कमी होण्यास मदत होईल.







