पुणे, ता. 27 : महावितरणच्या वीजमीटरमध्ये तांत्रिक फेरफार करून तब्बल 30 महिन्यांत 2,10,748 युनिट्सची वीजचोरी केल्याचा प्रकार वेळू (ता. भोर) येथे उघडकीस आला आहे. आय.आर.ओ. एलईडी इंडिया एलएलपी या कंपनीने एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत 39 लाख 75 हजार 640 रुपयांची वीजचोरी केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी कंपनीचे मालक निमांशु दिनेश राठोड यांच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या पुणे ग्रामीण भरारी पथकाने 9 सप्टेंबर 2026 रोजी वेळू येथील श्रीजी इलेक्ट्रॉनिक्स बिल्डिंगमधील कंपनीच्या वीजजोडणीची तपासणी केली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र दिगंबर ढवळे उपस्थित होते. तपासणीदरम्यान कंपनीतील तीन फेजची विद्युत उपकरणे सुरू असतानाही मीटरच्या आर. फेजवर करंट शून्य असल्याचे आढळले.
भरारी पथकाने मीटरची तपासणी केली असता त्याच्या बॉडीच्या उजव्या कोपऱ्यात छिद्र आढळले. मीटर उघडून पाहिल्यानंतर आर. फेजच्या सीटीची पिवळ्या आणि लाल रंगाची वायर पिळून धारदार वस्तूने कापल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एका फेजची वीज वापराची नोंद मीटरमध्ये होत नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

तपासणीवेळी कंपनीचा प्रत्यक्ष विद्युत जोडभार 100.221 किलोवॅट, म्हणजेच 134.34 एचपी आढळला. मात्र, कंपनीचा मंजूर भार केवळ 20.79 किलोवॅट (27.87 एचपी) होता. मंजूर भारापेक्षा जवळपास 5 पट अधिक विद्युत भार वापरला जात असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. महावितरणने वीजमीटर ताब्यात घेऊन त्यावर सील लावले असून, 13 लाख 50 हजार रुपयांची तडजोड रक्कम निश्चित केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.







