जळगाव : रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये गेलेल्या जळगावच्या पाटील कुटुंबासोबत घडलेल्या भीषण घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात काही हल्लेखोरांनी भररस्त्यात वाहन अडवून कुटुंबातील सदस्यांना कालव्यात फेकल्याची घटना समोर आली होती. आता या प्रकरणामागे विमा घोटाळ्याशी संबंधित कारण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील नितीन ऊर्फ भुरिया पाटील हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रोजगारासाठी ते 21 नोव्हेंबर रोजी पत्नी आणि मुलांसह गुजरातला निघाले होते. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने खाली उतरवून जवळच्या कालव्यात फेकल्याचा आरोप आहे.
या घटनेत 13 वर्षीय मुलाने प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवला. पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाण्यापासून बचाव करण्यासाठी त्याने कालव्यातील पाईप पकडला. त्यानंतर बाहेर येऊन जवळच्या हॉटेलमध्ये घडलेला प्रकार सांगितला. हॉटेलमधील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर बचावकार्य सुरू झाले.

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने कालव्यात शोधमोहीम राबवली. या दरम्यान नितीन पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि कुटुंबातील एका तरुणीचे मृतदेह आढळले. तर प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील हे दोन मुलगे अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
विमा घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील कुटुंब विमा घोटाळ्याच्या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांची साक्ष आरोपींच्या विरोधात जाऊ नये, या उद्देशाने हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीही सुरत पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेतली.
या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलिस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 पथके तयार केली असून अधिक तपास सुरु आहे.






