पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध हॉकर्स झोन तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात योग्य जागांची पाहणी केली जाणार असून, पात्र विक्रेत्यांना व्यवसायाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्याची प्रक्रियाही वेगाने पूर्ण केली जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा पथविक्रेता समितीचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.

शहरातील सुमारे 30 हजार पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी योग्य जागा आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. संभाव्य हॉकर्स झोन निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. तसेच सर्वेक्षणात गैरप्रकार करून प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. पात्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यावरही भर दिला जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली. पथविक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेने आंदोलन आणि न्यायालयीन लढा दिल्यानंतर चार वर्षांनी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. आता हॉकर्स झोन तयार करण्यासाठी आणखी विलंब करू नये. पुढील 4 महिन्यांत जागा निश्चित करून विक्रेत्यांना कायमस्वरूपी व्यवसायाची व्यवस्था द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘स्मार्ट हॉकर’ संकल्पनेवर भर
शहराच्या विकासासोबत पथविक्रेत्यांचे रोजगारही सुरक्षित राहावेत, यासाठी ‘स्मार्ट हॉकर’ संकल्पना राबविण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. यामध्ये स्वच्छता, आधुनिक सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जाणार आहे. शहराचे सौंदर्य, वाहतूक व्यवस्था आणि विक्रेत्यांचा रोजगार यांचा समतोल राखण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.






