नवी दिल्ली : बाजारात मिळणारे बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर किती सुरक्षित आहे, याची खात्री करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशभरात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, त्यांची उत्पादने आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी वापरणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

या मोहिमेसंदर्भात FSSAI ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यानुसार पाणी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची नियमित पाहणी करणे, तसेच गरजेनुसार पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करणे बंधनकारक असेल. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित कंपन्यांवर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि मिनरल वॉटरसाठी यापूर्वी भारतीय मानक ब्युरोचे (BIS) प्रमाणपत्र अनिवार्य होते. मात्र, ही अट हटवल्यानंतर FSSAI ने या उत्पादनांचा समावेश ‘उच्च जोखीम असलेले अन्नपदार्थ’ या श्रेणीत केला आहे. त्यामुळे आता या उत्पादनांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

तपासणीदरम्यान घेतलेले नमुने, प्रयोगशाळेतील अहवाल आणि कारवाईचा तपशील फूड सेफ्टी कम्प्लायन्स सिस्टीम (FoSCoS) या ऑनलाइन पोर्टलवर नोंदवला जाणार आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणे शक्य होईल.
FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात ही मोहीम सुरू झाली आहे. तपासणीचे अंतिम निष्कर्ष समोर येण्यासाठी किमान 1 ते 2 महिने लागू शकतात. ही नियमित देखरेखीचा भाग असून कोणत्याही विशिष्ट तक्रारीमुळे ही तपासणी सुरू करण्यात आलेली नाही.






