डॉ. अशोक बालगुडे

पुणे: पाचशे कोटींच्या कथित व्यवहाराच्या आरोपांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडविल्यानंतर अखेर तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या अंकुशनगर येथील निवासस्थानी बुधवारी (दि. २५) सायंकाळी विशेष तपास पथक (एसआयटी) दाखल झाले. पथकाने रात्री उशिरापर्यंत जरांगे यांची चौकशी केली. कथित ऑडिओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह ताब्यात घेऊन सील करण्यात आला असून, त्याचा पंचनामाही करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेल्या कथित पाचशे कोटींच्या व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापले होते. जरांगे यांनी ही क्लिप तपासासाठी दिली असून, तिची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. क्लिपमधील आवाज, संभाषणाची सत्यता आणि त्याचा स्रोत यांची पडताळणी तपासात होणार आहे. क्लिपचा मूळ स्रोत सांगण्याबाबत जरांगे यांनी संबंधित व्यक्तीच्या सुरक्षिततेची हमी मिळण्याची अट घातली आहे. रामदास कदम यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आता आरोपांच्या राजकीय फटाक्यांपेक्षा फॉरेन्सिक अहवालाचा आवाज मोठा ठरणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.







