सागर जगदाळे

भिगवण (प्रतिनिधी): भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सचिन भस्मे यांचे आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने भिगवण पोलीस ठाण्यासह संपूर्ण पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.
पोलीस हवालदार सचिन भस्मे यांना गेल्या पाच ते सहा दिवसांपासून प्रकृतीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर बारामती येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

मूळचे करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण गावचे रहिवासी असलेले सचिन भस्मे सध्या भिगवण पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावत होते. आपल्या कर्तव्यावर असताना त्यांनी पोलीस विभागात सहकाऱ्यांसोबत काम केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
सचिन भस्मे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीचे असे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने मिरगव्हाण गावासह भिगवण परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला असून, पोलीस हवालदार सचिन भस्मे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने पोलीस विभागाने एक सहकारी गमावला असून, त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी भावना व्यक्त होत आहे.






