विशाल शिंदे

भोर (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील तांभाड येथील मादगुडेवाडी परिसरात गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत तब्बल आठ घरे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास मादगुडेवाडी येथील घरांना अचानक आग लागली. आगीची तीव्रता वाढत गेल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. आगीच्या ज्वाळांनी घरांना वेढा दिल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य वाचविण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ उडाली. मात्र आगीचा वेग आणि तीव्रता अधिक असल्याने आठ घरांना मोठा फटका बसला. घरातील कपडे, धान्य, फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच इतर संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या. अनेक कुटुंबांचा वर्षानुवर्षे उभा केलेला संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बाधित कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे.

घटनेची माहिती मिळताच भोर नगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांनीही मदतकार्यात सहभाग घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे आग विझविण्याचे काम करण्यात आले.
या दुर्घटनेत नुकसान झालेल्या नागरिकांमध्ये शांताराम रामभाऊ वाल्हेकर, सुरेश पांडुरंग वाल्हेकर, कृष्णाबाई सोमा वाल्हेकर, आनंदा कोंडिबा वाल्हेकर, निलेश भाऊ वाल्हेकर, प्रकाश गोविंद वाल्हेकर, रमेश दिनकर वाल्हेकर आणि गणपत लक्ष्मण वाल्हेकर यांचा समावेश आहे.
दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अधिकृत आकडा समोर येणे बाकी आहे. संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करावा आणि बाधित कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.






