पुणे : बोपदेव घाटात भरधाव आयशर टेम्पोने बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी जखमी झाले. या अपघातात जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांपैकी सिद्धेश राजे याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलत्या एका मुलाच्या जाण्याने आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे.

सिद्धेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. मात्र, मुलाने शिकून मोठे व्हावे, या स्वप्नासाठी वडिलांनी कर्ज काढून त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती. पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात भाड्याने घर घेऊन त्यांनी सिद्धेशला शिक्षणासाठी ठेवले होते. शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या सिद्धेशचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधारच हरपला आहे.
मुलाच्या मृत्यूने व्याकूळ झालेल्या आईने माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना आक्रोश केला. “मला कोणाकडून काहीच नको. मी कालपासून माझ्या बाळाची वाट बघतेय. माझ्या बाळाला परत आणा,” असे म्हणत त्यांनी हंबरडा फोडला.

या अपघाताला कारणीभूत असलेल्याला जिवंत सोडू नका, अशी मागणीही सिद्धेशच्या आईने केली. एका मुलाला शिकवून मोठे करण्यासाठी कुटुंबाने घेतलेले कष्ट आणि त्याच मुलाच्या अकाली मृत्यूने उद्ध्वस्त झालेली स्वप्ने, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






