उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील आश्रम रोडवर एचडीएफसी बँकेसमोरील डिव्हायडरवर बुलेट मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 31 ऑक्टोंबर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. अपघातात त्याच्यासोबत असलेल्या मित्रालाही दुखापत झाली होती. अपघातानंतर तब्बल 12 दिवस उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला.

शुभम तानाजी जाधव (वय-27, रा खेडेकर बिल्डींग, आश्रमरोड उरुळी कांचन ता. हवेली जि पुणे मुळ रा. शेळगाव ता. इंदापुर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभमचा गुरुवारी (ता. 12 नोव्हेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत त्याचा भाऊ ऋषिकेश तानाजी जाधव (वय 27) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर राजेश मेमाणे हा जखमी झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम जाधव हा मित्र सौरभ राजेश मेमाणे याच्यासोबत बुलेट मोटारसायकलवरून लोणी काळभोर येथून उरुळी कांचनच्या दिशेने 31 ऑक्टोंबरला निघाले होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते आश्रम रोडने जात असताना एचडीएफसी बँकेसमोरील डिव्हायडरवर त्यांची दुचाकी घसरून पडली. या अपघातात शुभम आणि सौरभ दोघांनाही डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाली. दोघांना तातडीने उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभमची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, तर सौरभवरही उपचार सुरू होते.

शुभमच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने 5 नोव्हेंबर रोजी त्याला पुढील उपचारासाठी पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह मूळ गावी शेळगाव, ता. इंदापूर येथे नेण्यात आला आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शुभमचा भाऊ ऋषिकेश जाधव याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले असून, या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र गोसावी करीत आहेत.






