पुणे : जून २०२१ मध्ये राज्य शासनाच्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या वाघोलीसह इतर गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन, भत्ते आणि वेतनवाढीचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे महानगरपालिकेत गावांचा समावेश झाल्यानंतर या गावांतील प्रशासकीय व्यवस्था आणि नागरी सुविधांमध्ये बदल झाले. मात्र, या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आर्थिक आणि सेवाविषयक प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम केलेल्या या कर्मचाऱ्यांनी गावांच्या स्वच्छतेपासून ते विविध नागरी सुविधांच्या व्यवस्थापनापर्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. महानगरपालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही त्यांच्या हक्काच्या आर्थिक लाभांबाबत स्पष्ट आणि समाधानकारक निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेत समावेश झाल्यापासून देय असलेल्या वेतनातील फरकाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. तसेच शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नियमानुसार मिळणे अपेक्षित असलेला घाण भत्ताही अद्याप अदा करण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली आहे.

याशिवाय, सन २०२४ मधील दोन ते तीन महिन्यांचे वेतन काही कर्मचाऱ्यांना अद्याप मिळालेले नसल्याने त्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत आहे. कमी वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक खर्च अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महानगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट झालेल्या या कर्मचाऱ्यांनी शहराच्या दैनंदिन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा आणि सेवेचा विचार करून त्यांचे वेतन, भत्ते व इतर आर्थिक लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी निगडित महत्त्वाचा विषय म्हणून पाहण्याची गरज असल्याचे आमदार कटके यांनी नमूद केले.
या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन वाघोलीसह पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे, वेतनातील फरक आणि घाण भत्ता देण्याबाबत कार्यवाही करावी, तसेच वेतनवाढीच्या प्रश्नाची तपासणी करून शासन नियमांनुसार योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.






