पुणे : शहरातील कॅम्प परिसरात १५ ऑगस्ट चौकाजवळ एका बँकेबाहेर बेवारस आणि संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ उडाली. या बॅगेत बॉम्ब असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसर काही काळासाठी रिकामा केला होता. मात्र, तपासणीनंतर बॅगेत कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आढळली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट चौकाजवळील एका बँकेबाहेर बेवारस बॅग पडल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षेच्या दृष्टीने आसपासचा परिसर रिकामा केला.
बॅगेत बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त झाल्याने बॉम्बशोधक व नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले. पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने बॅगेची सखोल तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह किंवा धोकादायक वस्तू आढळून आली नाही.

तपासणीनंतर परिसरातील नागरिक आणि प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






