पुणे : शहरातील वारजे परिसरात गांजा विक्रीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने ५५ वर्षीय महिलेला अटक केली आहे. अमर भारत सोसायटी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. तिच्याकडून २९ हजार ६०० रुपये किमतीचा ५९२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही तिच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक वारजे आणि नांदेड सिटी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी अमर भारत सोसायटी परिसरात एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि पोलीस कर्मचारी तुषार किंद्रे यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने परिसरात सापळा रचला आणि संशयित महिलेला ताब्यात घेतले. सुनीता सिकंदर भाट (वय ५५, रा. अमर भारत सोसायटी, वारजे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

तिच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये ५९२ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, त्याची किंमत २९ हजार ६०० रुपये आहे.
या प्रकरणी सुनीता भाट हिच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही तिच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्रीसंदर्भात दोन गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. या कारवाईमुळे वारजे परिसरातील अमली पदार्थ विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.






