नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2027 कडून देशातील कर्मचारी आणि कामगारांना मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विविध कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारसमोर अनेक मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये किमान मासिक वेतन 42 हजार रुपये करण्यापासून ग्रॅच्युइटीची मर्यादा दुप्पट करून 40 लाख रुपये करण्यापर्यंतच्या प्रस्तावांचा समावेश आहे. मात्र, या मागण्यांवर सरकारकडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) या संघटनेने वाढत्या महागाईचा विचार करून कर्मचाऱ्यांचे किमान मासिक वेतन 42 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. दैनंदिन गरजा आणि वाढता खर्च लक्षात घेता सध्याचे वेतन पुरेसे नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याशिवाय नोव्हेंबर 2025 मध्ये लागू झालेल्या 4 नवीन कामगार संहिता मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सध्या ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपये आहे. ती वाढवून 40 लाख रुपये करावी, असा प्रस्ताव कामगार संघटनांनी मांडला आहे. तसेच प्रत्येक पूर्ण वर्षाच्या सेवेसाठी 15 दिवसांऐवजी 21 दिवसांचे वेतन गृहीत धरून ग्रॅच्युइटीची गणना करावी, अशीही मागणी आहे. यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळू शकते.

आशा सेविकांना दरमहा 10 हजार रुपये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये आणि मदतनीसांना 12 हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
20 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर या मागण्या मांडण्यात आल्या. आता अर्थसंकल्प 2027 मध्ये सरकार कोणत्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेते, याकडे कर्मचारी आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.






