पुणे: पुणे शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत होर्डिंगविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून, बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांमध्ये आपले नावही आले, तर ते पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट करण्याची सूचना त्यांनी विनोदी शैलीत केली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची नावेही जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत पुणे महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. शहरातील रस्ते, पदपथ आणि पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठीही पुरेशी जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे. नियम केवळ सरकारी दस्तावेजांमध्ये ठेवण्यासाठी नसतात, तर त्यांचे पालनही झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
बेकायदा होर्डिंगची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून देशभरातील अनेक शहरांमध्ये ती दिसून येते. त्यामुळे अशा फलकांवर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई होणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेने या समस्येवर उपाय म्हणून स्वीकारलेली अभिनव आणि ‘पुणेरी’ पद्धतीची मोहीम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा,’ असे आवाहनही त्यांनी महापालिका प्रशासनाला केले. आगामी काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी आणि शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी जनतेमध्ये दिसले पाहिजे; बेकायदा होर्डिंगवर नाही, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला.
दरम्यान, पुणे शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिकेने २४ नोव्हेंबरपासून ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेने ‘bhauflexkadha.pmc.gov.in’ हे संकेतस्थळ सुरू केले आहे. नागरिकांना शहरात आढळणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र काढून या पोर्टलवर अपलोड करता येते. सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स आढळलेल्या व्यक्ती किंवा संस्थांची नावे आणि छायाचित्रे २४ तासांत संकेतस्थळावर ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे’ मानकरी म्हणून प्रसिद्ध केली जाणार आहेत.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. व्यावसायिक आणि ब्रँड्सच्या गटात ब्रह्मप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी आणि शांतिप्रिया/शांती शिखर यांची नावे समाविष्ट आहेत.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा दावा करणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचेच अनधिकृत फ्लेक्स समोर आल्याने या मोहिमेची चर्चा रंगली आहे. वाढदिवस, नियुक्त्या, स्वागत, सत्कार आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने चौक, रस्ते, पदपथ, झाडे तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावले जातात. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याने अनधिकृत जाहिरात फलकांविरोधातील कारवाईला नवे बळ मिळाले आहे. आता ही मोहीम किती सातत्याने राबवली जाते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसह सर्वच अनधिकृत फ्लेक्सधारकांवर समान कारवाई होते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.






