पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क आणि सक्रिय राहावे. गुन्हेगारी प्रवृत्तींचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. अवैध शस्त्रे बाळगणारे, कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर वचक निर्माण करावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलिसांना दिले आहेत.

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या कामकाजाचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा सुनेत्रा पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपकुमार गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शिवाजीनगर न्यायालय परिसरात झालेली खुनी हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हेगारी हालचालींची गोपनीय माहिती संकलित करणारी यंत्रणा अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांसह कोयता गँग आणि अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्था वाढवावी. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही सुनेत्रा पवार यांनी दिले.
पोलीस विभागाने आपली कार्यक्षमता आणि कामगिरी अधिक उंचावण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
घडलेली घटना दुर्दैवी असली तरी पोलीस दल आपल्या कामगिरीत सुधारणा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात पोलीस दलाचा धाक आणि दबदबा नागरिकांना निश्चितपणे दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे शहराची शांतता, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क, सक्षम आणि परिणामकारकपणे काम करावे. या कामात नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.






