दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर न्यायालयात पुणे येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. राजेश कातोरे यांचे ‘आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन इन क्रिमिनल ट्रायल’ (उलट तपास) या विषयावर गुरुवारी (दि.२) व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती इंदापूर बारचे सचिव ॲड. आशुतोष भोसले यांनी दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. राजेश कातोरे म्हणाले की, फौजदारी स्वरूपाचे खटले चालवताना फिर्यादी, साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अंमलदार, डॉक्टर, शवविच्छेदन करणारे तज्ञ, तसेच विशेष तज्ञ साक्षीदार जसे की फिंगरप्रिंट एक्सपर्ट ,हस्ताक्षर तज्ञ आदींचा उलट तपास घेताना काय स्वरूपाची तयारी केली पाहिजे याविषयी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कोणते प्रश्न विचारले पाहिजे ह्यापेक्षा कोणते प्रश्न विचारू नयेत याची वकिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे व आपण केलेल्या तयारीपेक्षा वेगळी परिस्थिती कोर्टात साक्ष घेताना निर्माण झाल्यास योग्य असा प्रसंगावधान बाळगून वकिलांनी तो प्रसंग कसा हाताळावा ह्याचे हि कौशल्य आत्मसात केले पाहिजे. तसेच उलट तपास घेताना घ्यावयाच्या छोट्या -छोट्या क्लुप्त्या व मार्गदर्शनपर तत्वे ॲड. राजेश कातोरे यांनी उपस्थितांना सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोहर चौधरी होते. तसेच यावेळी ॲड. प्रकाश वाघमोडे, ॲड. एल. पी. शिंगाडे, ॲड. तेजसिह, सदस्य रुद्राक्ष मनसे ॲड. रवींद्र कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अनिल पारेकर यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. आशुतोष भोसले ह्यांनी केले. यावेळी इंदापूर वकील संघटनेचे वकील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.