राहुलकुमार अवचट

यवत: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व यवत गावची ग्रामदेवी असलेल्या श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे आषाढ यात्रेनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून आज आठवडे बाजार व शुक्रवार असल्याने आखाड यात्रेनिमित्त भाविकांनी आपले नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्या वतीने देवीची आकर्षक पूजा व फुलांची सजावट करून आरती करण्यात आली.

यवत गावात असलेली श्री महालक्ष्मी माता ही अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने नवस फेडण्यासाठी अनेक भाविकांनी मंदिर परिसरात जेवणावळीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच मंदिराच्या परिसरात स्वयंपाकासाठी महिलांची लगबग चालू होती. तर दुपारनंतर पाहुण्यांची गर्दी होऊ लागली यावेळी सर्वत्र आखाड यात्रेनिमित्त पंगती चालू असल्याचे दृश्य दिसून आले . आखाड महिना , आठवडी बाजार,जेवणावळी व आलेले पाहुणे, भाविकांची गर्दी, खेळणी विकणारे व्यापारी यामुळे श्री महालक्ष्मी माता मंदिर व यवत परिसराला मोठ्या यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते.

दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा ते अमावस्या याकाळात श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे नवस पेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. दरवर्षी गुरुपौर्णिमेनंतर आलेल्या पहिल्या रविवारी वनभोजनासाठी गाव बंद असल्याने तर येणाऱ्या रविवारी एकादशी असल्याने अनेक यात्रेकरूंनी आज शुक्रवारीच आपल्या यात्रेचे आयोजन केले होते.
यावेळी श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्या वतीने भाविक भक्तांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था व सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
देवीचा फोटो मोबाईल मध्ये घेण्यासाठी भाविकांची गर्दी
दरवर्षी श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे आखाड उत्सव मोठ्या साजरा होत असल्याने श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्यावतीने देवीची केलेली अलंकारिक पूजा व सजावट याचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये घेण्यासाठी अनेक भाविकांनी लगबग सुरू होती.







