पुणे: जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा संघटित पद्धतीने गांजाविक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या दोघांना पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-२ ने तुकाई टेकडी परिसरातून अटक केली आहे. या कारवाईत ७३ हजार ८०० रुपयांचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, पोलिसांची कारवाई सुरू असताना गांजा खरेदीसाठी आलेले तब्बल ८४ जण घटनास्थळी आढळून आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे स्वप्नील दयानंद गंधारे (वय २२) आणि प्रतीक बाळू गाडे (वय २२, रा. ओंकार कॉलनी, तुकाई दर्शन, हडपसर) अशी आहेत. या दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक जामिनावर बाहेर आल्यानंतर काही युवकांच्या मदतीने पुण्यातील विविध भागांत संघटित पद्धतीने गांजाविक्रीचे जाळे चालवत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने तुकाई टेकडी परिसरात सापळा रचून कारवाई केली. छाप्यामध्ये आरोपींकडून गांजाचा साठा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

दरम्यान, कारवाई सुरू असताना गांजा खरेदी करण्यासाठी आलेले ८४ जण घटनास्थळी आढळले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले असून, पुढील आवश्यक कारवाईसाठी त्यांना फुरसुंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची, गांजाच्या पुरवठा साखळीची आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयितांची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. तसेच आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके आणि अमली पदार्थविरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक आणि त्यांच्या पथकाने केली.







