इम्रान आत्तार

भोर : भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात रविवारी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरड कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती साचली असून, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेला मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, दरड हटवल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वरंधा घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गाने प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







