उरुळी कांचन : कोरेगाव मूळ-प्रयागधाम रस्त्यावर टेम्पोतून गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या एकाला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेम्पोतून पोलिसांनी 3 लाख 91 हजार रुपयांची तयार गावठी दारू व वाहतूक करणारा 3 लाखांचा टेम्पो असा 6 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
नवनाथ ज्ञानदेव कांबळे (वय- 32 सध्या रा. रामदासनगर, चिखली, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. रिटेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापुर), असे ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रविवारी (ता. 13) दुपारी हि कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार उध्दव मारुती गायकवाड यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना त्यांना एक टेम्पो हा संशयितरीत्या निघालेला दिसून आला. त्याला थांबवून टेम्पोच्या पाठीमागील बाजूस पाहणी केली असता पाठीमागील हौद्यात ठेवलेली 35 लिटर मापाचे एकूण 26 कॅन मिळून आले. यामध्ये काळे रंगाचे 15 कॅन, निळे रागांची 02 कॅन, पांढरे रंगांची 02 कॅन प्रत्येक कॅनमध्ये 35 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू अशी एकूण 210 लिटर दारू मिळून आली.
दरम्यान, याप्रकरणी नवनाथ कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातील टेम्पो व तयार गावठी हातभट्टीची दारू असा 6 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सस्ते करीत आहेत.