Koregaon Bhima Sad News लोणी कंद : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) Koregaon Bhima Sad News येथील ज्येष्ठ पत्रकार काळूराम दिनकर गव्हाणे उर्फ के. डी. भाऊ (वय-५८) यांचे आज गुरुवारी (ता.२०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. पत्रकारिता क्षेत्रातील एक तारा हरपल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साधारणतः एक महिन्यापूर्वी पुणे नगर महामार्गावरील लोणीकंद पावर हाऊस जवळ रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने के.डी. भाऊ यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी तातडीच्या वाघोली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पत्रकार बांधव, मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर…!
दरम्यान, के.डी. भाऊ यांची आज गुरुवारी (ता.२०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कोरेगाव भीमा गाव, सर्व पत्रकार बांधव, मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
के. डी. भाऊ यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुमारे ३० वर्ष समाजाची सेवा केली आहे. पूर्वीच्या काळी सुधारित तंत्रज्ञान नसताना के. डी. भाऊ माध्यमांसाठी बातम्या हाताने लिहून लिफाफेमध्ये टाकून एसटीच्या साह्याने शहरांमध्ये पाठवत असे. भाऊंनी आपल्या जीवनामध्ये पत्रकारिता करत असताना अनेक मित्र जोडले, त्यांनी पत्रकार संघटनेवर देखील नेतृत्व केले आहे.
समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय असून, त्यांनी अनेक आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अनेक पत्रकार घडवण्याचे काम देखील केले आहे. ते पत्रकारांचे आधारस्तंभ होते. त्यांनी दैनिक प्रभात, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत या वृत्तपत्रांसाठी काम केले असून, ते सुयश विद्यार्थी दिनदर्शिकाचे संपादक होते.