गणेश सुळ
केडगाव : नानगाव ता. दौंड येथे पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरावरील वंध्यत्व समस्या विषयी मार्गदर्शन आणि उपाययोजना या कार्यक्रमाचे १५ डिसेंबरला रोजी आयोजन करण्यात आले होते. गाव, वाडी, वस्ती येथे जाऊन पशुसंवर्धन विभागाचा एक समूह शेतकऱ्यांना या विषयी मार्गदर्शन करत आहे.
गायी, म्हशी नियमितपणे व्याल्यास ती फायदेशीर ठरते. गाय वेळेत माजावर न येणे, दोन वेतातील गर्भधारणेचा कालावधी अधिक असणे, गायी, म्हशी वारंवार उलटणे ह्या समस्येमुळे जनावरामध्ये वांझपणा येतो व शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. जनावरांची वांझपणाची कारणे माहित नसणे, शेतकऱ्याने आपल्या जनावरांच्या नोंदी ठेवणे, आहारातील दोष, नियमित तपासणी करणे, काळजी घ्यावी अशी माहिती यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एस. उटगे यांनी दिली.
डॉ. उटगे म्हणाले की, उस कारखाने सुरु झाले आहेत, बैल जोडी आपल्या गावात फिरत आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात लाळखुरकतीचे प्रमाण वाढते. प्रत्येक गावत १०० टक्के लसीकरण करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत. दोन महिन्याच्या पुढील सर्व जनावरांचे लाळखुरकत लसीकरण करून घ्यावे. लाळखुरकतीमुळे जनावरामध्ये वांझपणा येतो.
जनावरे दगावतात. नवीन बाजारातून आता तरी सध्या खरेदी थांबवा. गोठ्यात चुनखडी फवारा. हा संसर्गजन्य आजार असल्याने तो माणसाच्या मार्फत आपल्या गोठ्यात देखील प्रवेश करतो. शेतकऱ्यांनी घरी थांबून हे लसीकरण करून घ्यावे असे आव्हान यावेळी डॉ. उटगे यांनी केले.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एस. उटगे, डॉ. ढाकूळकर, आबासाहेब खळदकर,शिवाजी खळदकर, विकास शेलार, चंद्रकांत सुपेकर, रविंद्र शिंगटे, निलेश गुंड, शिवाजी दिवेकर, शिवाजी गुंड, डॉ. सुरेश सातपुते (बायेफ), डॉ. संकेत थोरात, गणेश म्हेत्रे, संजय गोफणे, रविंद्र ताडगे, अक्षय पवार, माणिक खळदकर, राजाराम यादव, आबासो आढागळे आदी उपस्थित होते.