दीपक खिलारे
इंदापूर : भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा पुणे जिल्हा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धेत कळंबच्या राणा प्रताप संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघास रोख रक्कम 31 हजार रुपये व चषक, द्वितीय विजेता संघ भालचंद्र निंबाळकर संघ, भवानीनगर 21 हजार रुपये रोख रक्कम व चषक तर तृतीय क्रमांक विजेता संघ जयंत स्पोर्ट्स, इस्लामपूर या संघास 11 हजार रुपये व चषक देण्यात आला. उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघास गौरविण्यात आले.
तावशी (ता. इंदापूर) येथे या स्पर्धेचे आयोजन किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष तानाजी थोरात, सचिन मचाले, लालासाहेब सपकळ, माऊली शेळके, सचिन भाग्यवंत व भैरवनाथ तरुण मंडळ तावशी यांनी केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातून अनेक नामांकित संघ सहभागी झाले होते. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या शीर्ष नेतृत्वाच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून देशातील खेळांना प्रोत्साहन मिळावे व त्यामधून राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार व्हावेत. त्यांना संधी मिळावी हा मुख्य उद्देश समोर ठेवून किसान मोर्चाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अत्यंत कमी कालावधीमध्ये स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी तानाजी थोरात व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यामधून बाबाराजे जाधवराव, दादासाहेब सातव, जयेश शिंदे, अविनाश मोटे, विलास माने, करण घोलप, गोविंद देवकाते यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.